पुणे : 15 वर्षाच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन 25 लाख रुपयांचे 84 तोळे सोन्याचे दागिने घरातून चोरायला लावणाऱ्यांना अटक

पुणे : एका व्यावसायिकाच्या १५ वर्षाच्या मुलाला त्याला व घराच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन २५ लाख २० हजार रुपयांचे ८४ तोळे सोन्याचे दागिने घरातून चोरी करायला लावून ते तिघांनी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत येरवडा येथील एका ४२ वर्षाच्या व्यावसायिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रोहित नवनाथ ओव्हाळ (वय २९, रा. जाधवनगर, येरवडा), रेहान शब्बीर कुरेशी (वय २५, रा. हुसेन शहा बाबा दर्ग्याजवळ, मेंटल कॉर्नर, येरवडा) आणि स्टिफन जॉन शिरसाट (वय १९, रा. सोमनाथनगर, येरवडा) यांना अटक केली आहे. हा प्रकार नोव्हेबर २०२४ ते २३ मार्च २०२५ दरम्यान फिर्यादीच्या घरी झाला. गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने या तिघांना पकडून त्यांच्याकडून ३३ तोळे सोन्याचे दागिने व ४ लाख रुपये रोख असा १४ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
येरवडा येथील चोरीच्या घटनेची माहिती सर्व पोलीस पथकांना कळविण्यात आली होती. त्यानुसार पोलीस हवालदार अजय गायकवाड, वैभव रणपिसे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तिघे जण सोन्याचे दागिने विक्री करण्यास जाणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी चंद्रमा चौकाच्या पुढे विश्रांतवाडीकडून येणार्या रस्त्यावर सापळा लावला. तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये ३३ तोळे ६९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दुचाकीच्या डिक्कीमध्ये ४ लाख रुपये रोख असा १४ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज मिळाला.
त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी त्यांच्या वस्तीत राहणार्या एका मुलाकडून वेळोवेळी दागिने घेतले होते. तसेच काही सोन्याचे दागिने कॅपरी लोन वाघोली व कॅपरी लोन विश्रांतवाडी येथे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिन्यांची ४ लाख रुपये रक्कम असल्याचे सांगितले. आरोपींना येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेशा बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक पोलीस फौजदार प्रविण राजपुत, एकनाथ जोशी, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचीम, नागेशसिंग कुंवर, वैभव रणपिसे, बाबासाहेब कराळे, भरत गुंडवाड, मनोज सांगळे, राहुल परदेशी, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे यांनी केली आहे.
असा आला प्रकार उघडकीस
या व्यावसायिकाने घरातील सर्वांचे दागिने कपाटात ठेवले होते. दोन दिवसांनंतर त्यांच्याकडे एक धार्मिक कार्यक्रम आहे. त्यामुळे फियार्दींच्या वडिलांनी सुनांना दागिने घालायला द्यावे लागतील म्हणून कपाटातील दागिने काढण्यासाठी तिजोरी उघडली. तेव्हा त्यात दागिने आढळून आले नाही. घरात बाहेरचे कोणी आले नसताना दागिने गेले कोठे याची चौकशी करत असताना या १५ वर्षाच्या मुलाने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
आरोपी यांच्या पैकी एकाचा मुलगा आणि फियार्दीचा मुलगा यांची ओळख होती. ते एकाच परिसरात रहात असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे होते. त्यातून आरोपींनी मुलाला धमकावून अगोदर काही पैसे आणून देण्यास सांगितले. तेव्हा या मुलाने दुकानातील १५ ते २० हजार रुपये गपचुप आणून दिले. काही दिवसांनंतर मुलगा दुकानात जात नव्हता. तेव्हा त्यांनी तुला आणि तुज्या घरांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आम्ही किती खतरनाक आहोत, हे तुला माहिती आहे, असे सांगून त्याला घरातून दागिने आणून देण्यास भाग पाडले. एक दोन करीत या मुलाने तब्बल २५ लाख रुपयांचे ८४ तोळे वजनाचे दागिने त्यांच्या स्वाधीन केले.