जालन्याच्या आसरखेडा येथील विहिरीत फेकून 3 महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेणारे दोघं जेरबंद…
चंदनझिरा पोलिसांनी आरोपी माता - पित्याला घेतलं ताब्यात...

चौथीही मुलगी झाल्यामुळे जन्मदेत्या माता-पित्यानेच विहिरीत फेकून केली होती चिमुकलीची हत्या…
जालना: जालन्याच्या आसरखेडा येथील विहिरीत फेकून 3 महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलंय. चौथीही मुलगी झाल्यामुळे जन्मदेत्या माता-पित्यानेच विहिरीत फेकून चिमुकलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांनी या प्रकरणी आरोपी माता – पित्याला ताब्यात घेतलंय. बदनापूर तालुक्यातील असरखेडा गावातील एका विहिरीत 12 एप्रिल रोजी एका तीन महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना चंदनझिरा पोलिसांनी जालना जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत जन्मलेल्या सर्व मुलींचा आणि त्यांच्या माता-पित्यांचा डाटा जमविण्यास सुरुवात केली होती. यावेळी असरखेडा परिसरातील गावे, तांडे, वाड्यांमध्ये जन्मलेल्या बालकांची माहिती काढत असतांना, त्यांना या चिमुकलीच्या खुनाचे धागेदोरे हाती लागले. आसरखेडा गावापासून जवळच असलेल्या गारवाडी तांडा (ता. बदनापूर) येथील सतीश पंडित पवार आणि त्याची पत्नी पूजा सतीश पवार यांना चौथे अपत्य ही मुलगीच झाल्यामुळे त्यांनी आपल्या 3 महिन्यांच्या मुलीला मोटारसायकलवरून येऊन, आसरखेडा येथील विहिरीत फेकून दिलं होतं. त्यानंतर आरोपी सतीश पवार याने त्याची पत्नी पूजा हिला वखारी वडगांव (ता. जालना) येथे मोटारसायकलवरून नेऊन सोडले होते. चिमुकलीचा खून तिच्या जन्मदेत्या माता पित्याने केल्याचं पोलीस तपासात समोर आल्याने पोलीस पथकाने तातडीने दोन्ही पती पत्नीला ताब्यात घेतल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.