पोलीस मित्रावर जीवघेणा हल्ला; पोलिस उपनिरीक्षकावर सुपारी देण्याचा आरोप
पोलिसांकडून निष्काळजीपणा?

- जालना (प्रतिनिधी) – शहरातील अवैध धंद्यांविषयी वरिष्ठांना सतत माहिती देणाऱ्या गायत्रीनगर येथील पोलिसमित्र दिलीप कोरवी यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला करण्यात आला असून, हा हल्ला पोलिस उपनिरीक्षकानेच गुंडांच्या मार्फत सुपारी देऊन घडवून आणल्याचा गंभीर आरोप कोरवी यांनी केला आहे.
दिलीप कोरवी हे जालना शहरातील अवैध धंद्यांबाबत पोलीस विभागाला वेळोवेळी माहिती पुरवण्याचे काम करत होते. त्यांच्या या कार्यामुळे काही भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांच्या अवैध धंद्यांमध्ये अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर एका पोलीस उपनिरीक्षकानेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना कोरवी यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
१३ एप्रिलचा हल्ला :
दिलीप कोरवी हे १३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास शिवाजी महाराज पुतळ्याजवळून आपल्या घरी, गायत्रीनगरकडे जात होते. राष्ट्रीय हिंदी विद्यालयाजवळील गतिरोधकाजवळ त्यांची दुचाकी कमी वेगात असताना, मागून आलेल्या दुचाकीवरील तीन हल्लेखोरांनी तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कोरवी यांचे कान कापले गेले, पाय तोडण्यात आला आणि गंभीर मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांच्या तोंडाला रुमाल बांधलेले होते.
हल्ल्यानंतर कोरवी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले. हल्लेखोरांनी कोरवी यांचा मृत्यू झाल्याचा समज करून घटनास्थळावरून पलायन केले. काही ओळखीच्या नागरिकांनी त्यांना तत्काळ विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
- पोलिसांकडून निष्काळजीपणा?
या प्रकरणी १४ एप्रिल रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा क्रमांक २८५/२०२५ नोंदवण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४ व २५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कोरवी यांचा आरोप आहे की, तपास अधिकारी वाघमारे यांनी या प्रकरणाच्या तपासात कोणतीही ठोस प्रगती केलेली नाही, तसेच अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
न्यायाची अपेक्षा कोणी करावी?
एका पोलिसमित्रावरच असा जीवघेणा हल्ला झाल्यावर सामान्य नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा करावी, असा सवाल आता नागरिकांमध्ये उपस्थित होऊ लागला आहे. दिलीप कोरवी यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.