धुळे घबाड प्रकरणात किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करा,अन्यथा न्यायालयात दाद मागणार
जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांचा राज्य सरकारला इशारा

जालना -धुळ्यात पकडण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या घबाड प्रकरणात मंत्रालयातील निलंबित सरकारी अधिकारी तथा अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची राज्य सरकारने नार्को टेस्ट केल्यास त्यातून किमान ५०० कोटी वसूल केल्याची बाब उघडकीस येईल असा खळबळजनक आरोप जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केला.
-महाराष्ट्र राज्य सरकारने गठीत केलेल्या अंदाज समितीचे आमदार सदस्य धुळे दौऱ्यावर असतांना शासकीय विश्रामगृहात किशोर पाटील यांच्या नावाने बुक असलेल्या एका खोलीत १ कोटी ८० लक्ष रुपयांची रक्कम धुळे पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष घालत या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले असले तरी मुख्य आरोपींना मात्र राज्य सरकारकडून पाठीशी घालण्याचे काम होत असल्याचा आरोप गोरंटयाल यांनी केला आहे.